बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अजूनही पावसाने सर्व दूर पेरणीयोग्य हजेरी लावली नाही. जिल्ह्यात केवळ 46.86 टक्केच पेरणी झाली. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत तर नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले असून,आपल्याला तिकीट भेटते का याची फिल्डिंग लावण्यात ते व्यस्त दिसून येत आहेत.
जिल्ह्याचे पेरणीयोग्य क्षेत्रफळ 7 लाख 35 हजार 320.96 हेक्टर आहे. त्यापैकी आज पर्यंत 3 लाख 44 हजार हेक्टरवर पेरणी उरकली आहे. दमदार पाऊस झाला नसल्याने अनेक भागातील पेरण्या खोळंबल्यात. जून महिना उलटत आला असून अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. पदरमोड करून काहींनी बी बियाण्याची सोय लावली आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचा कळवळा आणणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता वेळ नाही. कारण लोकसभा निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सध्या नेतेमंडळी व कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी आपल्या पक्ष बांधणीची पेरणी करीत आहेत.