बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अवघ्या ५ वर्षाच्या विनायक ने दोन वर्षांपूर्वी कळसूबाई शिखर अडीच तासात सर करून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवला होता. त्याच विनायक ने आज वयाच्या सातव्या वर्षात वानरलिंगी सुळक्यावर ४०० फूट रॅपलिंग केले त्याच्या हा थरार अनेकांना थक्क करणारा आहे.
बुलढाणा शहरातील ७ वर्षाच्या विनायक प्रतिभा प्रशांत राऊत ने दोन दिवसात त्याच्या वयोमानानुसार ३ विक्रमच रचले आहेत. पहिले, अवघ्या ७ वर्षात १६४६ मिटर उंची असलेले कळसूबाई शिखर दोनदा सर केले. दुसरे, चढाई साठी खडतर असलेला जिवधन किल्ला ते ३५० फूट अंतरावर असलेल्या वानरलिंगी सुळक्याचे शिखर आणि यादरम्यान असलेली ४००० फूट खोल जीवघेणी दरी चिमुकल्या ने झिप लाईन द्वारे पार करून एक विक्रमच केला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दूसऱ्या वर्गात शिकत असलेल्या विनायक ने जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी सुळक्यावरून ४०० फूट रॅपलिंग करून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवला आहे.सहकार विद्या मंदिर चा विद्यार्थी असलेल्या विनायक ने वरील तीन ही गोष्टी दोनच दिवसात पूर्ण करून त्याच्या खडतर मेहनतीचे व प्रचंड उर्जेचे आदर्श उदाहरणच त्याच्या वयातील इतर मुलांसमोर उभे केले आहे. विनायक ने या सर्व गोष्टींचे श्रेय त्याच्या पालकांना दिले आहे. वन्यजीव सोयरे च्या विविध उपक्रमात चिमुकल्या विनायक चा सक्रिय सहभाग असतो. त्याच्या पुढच्या वाटचाली ला ‘हॅलो बुलढाणा’ टिम कडून शुभेच्छा व अभिनंदन !














