बुलढाणा (हॅलो बुलढाणा) घराची साफसफाई करणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या महिला घरातील मौल्यवान वस्तूंवर देखील हात साफ केल्याच्या घटना अनेकदा आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार चिखलीतून समोर येत आहे. कपाटातून सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख 36 हजार रुपयांचा रोख मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार 24 जून रोजी पोलिसांना करण्यात आली.येथील तक्रारदार मयूर राजेंद्र अग्रवाल यांनी एका घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय देखील व्यक्त केला आहे.
अडत व्यापारी मयूर राजेंद्र अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बाहेरगावी गेलेल्या वडिलांनी 24 जून रोजी मला फोन केला. कपाटात ठेवलेले दागिने त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. परंतु दागिने व रोख रुपये कपाटात दिसून आले नाही. दरम्यान घरकाम करणाऱ्या 3 महिलांना विचारपूस केली असता एका महिलेवर मयूर अग्रवाल यांना संशय आला. एकूण 1 लाख 36 हजार रुपयांची ही चोरी असून, दोन महिन्यापूर्वी देखील 24000 आणि एका महिन्यापूर्वी 18 हजार रुपयांची देखील चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत. अशा चोरीच्या घटनेमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.














