मलकापूर (हॅलो बुलढाणा) दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वा. दरम्यान रणथम फाट्या नजीक घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रूईखेड तालुका मुक्ताईनगर येथील निना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५), सुनिता निना नारखेडे (वय ५९) हे पुर्णाकाठवरील दुधलगाव येथे नातेवाईकाकडे भेटीसाठी गेले होते. दरम्यान ते परतीच्या मार्गाने रूईखेड येथे जात असतांना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निना ज्ञानदेव नारखेडे , सुनिता निना नारखेडे हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच महामार्गावरील टोलनाक्यावर असलेल्या रूग्णवाहिकेद्वारे सचिन संबारे, दिपक म्हस्कादे, निना खडसे यांनी त्या दोघांना उपजिल्हा रूग्णालयात आणले.उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.










