बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगाव तालुक्यातील गावातील केस गळती आणि टक्कल बाधित रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचे धक्कादायक दृश्य आहे. या अज्ञात आजाराची रुग्ण संख्या आज गुरुवारी, 9 जानेवारी अखेर शंभरावर पोहोचली आहे.
या केसगळतीच्या आजाराने आज अखेर 11 गावात पाय पसरले आहे. काल संध्याकाळी ही संख्या 51 इतकी होती नंतर प्राप्त झालेल्या अहवालनंतर ती 68 इतकी झाली होती. दरम्यान आज शेगाव तालुक्यातील अन्य गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षण नंतर ती आज संध्याकाळ पर्यंत 100 पर्यंत पोहोचली आहे. आज गुरुवारी जवळा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या तरोडा कसबा गावात 10 रुग्ण आढळून आले आहे. जलंब केंद्र अंतर्गतच्या माटरगाव 8, पहूरजिरा 12, नींबीत 5 रुग्ण आढळून आले. आज अखेर 11 गावात 100 रुग्ण आढळून आले आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
▪️पाण्याचा अहवाल धक्का देणारा!दरम्यान यापैकी काही गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पाण्यात नायट्रेटस चे प्रमाण जास्त आहे हे प्रमाण एक लिटर पाण्यात 10 मिलिग्राम असायला हवे मात्र ते प्रमाण 54 मिलिग्राम असल्याचे आढळून आले आहे.तसेच क्षाराचे ( टिडीस )प्रमाण 2100 निघाले असून सामान्य स्थितीत ते केवळ 110 इतके असायला पाहिजे, असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यावर कळस म्हणजे या पाण्यात घातक असे
आरसेनिक व लीड आढळून आले आहे. याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.










