चिखली (हॅलो बुलडाणा) दख्खन मराठा समाज हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातून स्थलांतरित होऊन वऱ्हाड, खानदेश, मध्य प्रदेश, वाशिम आणि विदर्भ भागात स्थायिक झालेला 96 कुळी मराठा समाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी आणि पेशवेकालीन पानिपतच्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे हा समाज विशेष ओळखला जातो.
1761 च्या पानिपत युद्धानंतर आणि त्यानंतरच्या दुष्काळाच्या काळात हा समाज टप्प्याटप्प्याने या भागात स्थायिक झाला. शिंदे, भोसले, गायकवाड, पवार, जाधव, चव्हाण, कदम यांसारख्या आडनावांनी परिचित हा समाज कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासणारा आहे. आई तुळजाभवानी आणि खंडेराय यांचे कुळदैवत असून, पारंपरिक पद्धतीने लग्नविधीत गोंधळ आणि देवपूजा करण्याची प्रथा येथे अजूनही जिवंत आहे.
वऱ्हाड व मध्य प्रदेशात स्थलांतरित झाल्यामुळे स्थानिक वतनदारी नसली तरी, या समाजाने आपल्या पराक्रमाची परंपरा जपली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यांचे रोटी-बेटीचे संबंध आजही टिकून आहेत. भाजप खासदार ज्ञानेश्वर पाटील गुंजाळ आणि हिंगोलीचे आमदार तानाजी पाटील मुटकुळे हे या समाजातील हिंदुत्ववादी राजकीय नेतृत्वाचे उदाहरण आहे.
दख्खन मराठा समाजाची इतिहासपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जपण्याची जिद्द यामुळे हा समाज आजही आपली ओळख कायम ठेवून आहे अशी माहिती विजय पवार यांनी एका कार्यक्रमात दिली