मलकापूर (हॅलो बुलडाणा) नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाच्या बांधकामाचे ७० लाख रुपये देयक न दिल्याने, नागपूर उच्च न्यायालयाने मलकापूर नगर परिषदेच्या मालकीच्या भूखंडाचा १० कोटींहून अधिक रक्कमेचा लिलाव २७ जानेवारी २०२५ रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मे. खरे अँड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., नागपूर या कंत्राटदार कंपनीने ७० लाख रुपयांसाठी वारंवार मागणी केली. मात्र नगर परिषदेने देयक न दिल्याने कंपनीने न्यायालयात धाव घेतली. लवादाने संबंधित रक्कम व वार्षिक १८% व्याज देण्याचे आदेश दिले. परंतु, नगर परिषदेने ना आदेश पाळले, ना रक्कम दिली.
न्यायालयाने याप्रकरणी कारवाई करत बुलढाणा रोडवरील महत्त्वाचा भूखंड लिलावासाठी ठेवण्याचा आदेश दिला. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावाद्वारे १० कोटी २४ लाख रुपये वसूल होणार आहेत. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हा भूखंड गमावण्याची वेळ आली आहे.