बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमाच्या शाळांना सुरुवात झाली असून शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 30 टक्के पर्यंत वाढ झालीय. त्यामुळे शिक्षणाच्या ‘बाजारात’ पालक बेजार दिसताहेत.विशेष म्हणजे शाळेच्या फळ्यावर आधीच टक्केवारीचे गणित ‘स्वार्थाच्या खडूने’ गिरवल्या गेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील काही विनाअनुदानित,स्वयंअर्थसहाय्यत
तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून विशिष्ट दुकानातून शालेय गणवेश, वह्या, पुस्तके व शालेय साहित्याच्या खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचे अस्वस्थ चित्र आहे. त्यामुळे पालक वर्गांच्या खिशाला कात्री लागली आहे.गणवेशासाठी काही शाळांकडून विशिष्ट दुकानाची शिफारस करण्यात येत असल्याचे पालक सांगत आहेत.काही विना अनुदानित, सीबीएसई, स्टेट बोर्डच्या शाळेकडून विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी एकाच दुकानाची शिफारस केली जाते. यासाठी काही शाळांना दुकान मालकाकडून टक्केवारी दिली
जाते. काही शाळेत विद्यार्थ्याला दोन गणवेश घेण्याबाबत सक्ती
केली जाते. त्यासोबत स्पोर्ट ड्रेसदेखील सक्तीचा करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याने याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.