देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) कृषी साहित्य व अवजारांच्या वाटप प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर दोषी कृषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्तालयाला कक्ष अधिकारी प्रदीप कदम यांनी तातडीने चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील कृषी उद्योग विकास महामंडळाकडून अनुदानित कृषी साहित्य वाटपात आर्थिक अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केली होती. चौकशीत स्पष्ट झाले की, कृषी अधिकाऱ्यांनी अनुदान व लोकवाट्याची रक्कम महामंडळाकडे वेळेत न भरता कोट्यवधींची थकबाकी ठेवली. २०१८ पासून सतत स्मरणपत्रे आणि नोटिसा देऊनही सदर रक्कम परत करण्यात आली नाही.कृषी आयुक्त पुणे यांच्या दक्षता पथकाने चौकशी केली असून अहवालातील दिरंगाईमुळे दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी, कृषी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
राज्य सरकारने हा गैरव्यवहार गंभीरतेने घेतला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. कृषी विभागातील ही अनियमितता शेतकऱ्यांच्या हक्कावर आघात करणारी आहे. या प्रकरणामुळे कृषी अधिकाऱ्यांची विश्वासार्हता आणि विभागाची पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.