बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी ‘फुकट’ प्रवास करीत असल्याचे समोर आले असून, चिखली येथील गत 6 दिवसात जेष्ठनागरिकत्वाची 132 तर बोगस दिव्यांगात्वाची 76 कार्ड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांनी दिली.
राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदांच्या विविध योजनांचा फायदा लाटण्यासाठी आता बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याचे पेव फुटले आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यासह कारकून, शिक्षकांनीदेखील सरकारी रुग्णालयांमधून बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे.शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला प्रवाशांसाठी निम्मे भाडे, तर 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास योजना सुरू केली आहे. यामुळे एसटीचा प्रवासी वाढला खरा,परंतु मोफत प्रवास करण्यासाठी बहुसंख्य प्रवाशांनी आधार कार्डवरील जन्मतारीख एडिट करून अशा प्रकारचे दोन ते चार आधार कार्ड बनवून त्याद्वारे मोफत प्रवास करण्याचा फंडा सर्रासपणे सुरू केला आहे. दरम्यान चिखली आगार डेपोच्या वतीने ज्येष्ठ नागरिक यांच्या ओळखपत्रांची तपासणी मोहीम भरारी पथकांमार्फत राबविली जात आहे.सदर तपासणी दरम्यान गेल्या 6 दिवसात जेष्ठ नागरिकांचे 132 बोगस ओळखपत्रे जप्त करण्यात आली असून यामध्ये 76 बोगस दिव्यांगांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.या बोगस कार्डधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे चिखली आगार व्यवस्थापक संतोष जोगदंड यांनी सांगितले आहे. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पद्धतशीरपणे बोगस प्रमाणपत्र वाटल्या जात असून,वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.