बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आज पासून विशेषता शैक्षणिक प्रश्न निकाली काढणार आहेत. यासोबतच आरोग्य आणि कृषी विभागावर देखील लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी ‘हॅलो बुलढाणाला’ सांगितले.
सीईओ जंगम यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारताच आपल्या कार्यक्षेत्रातील विविध योजनांवर काम करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे शैक्षणिक विभागाकडे लक्ष वेधून आहे. सध्या जिल्ह्याला वादळी तडाखा बसल्याने अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. अनेक शाळांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. ह्या पडझड झालेल्या शाळांना सुव्यवस्थित करण्याचे त्यांनी आज आश्वासन दिले. शिवाय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याचे देखील सांगितले आहे.नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कुलदीप जंगम कामकाज पाहत होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशान्वये कुलदीप जंगम यांची बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार बी.एम. मोहन यांच्याकडे देण्यात आला. आता ते विशेष करून शैक्षणिक, आरोग्य आणि कृषी विभागांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.