बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्री दत्त जयंतनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, राऊतवाडी क्रीडा संकुल रोड, बुलढाणा येथे 9 डिसेंबरपासून अखंड नाम जप व गुरुचरित्र पारायण यज्ञ सप्ताह सुरू आहे. या कार्यक्रमात 400 पेक्षा जास्त सेवेकरी गुरुचरित्र पारायण करत आहेत. त्याचबरोबर भागवत पारायण, नवनाथ पारायण, श्रीपाद चरित्र, शिवलीलामृत, ज्ञानेश्वरी आदी अनेक ग्रंथांचे पारायण भक्तिमग्नतेने केले जात आहे.
प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रोज त्रिकाळ आरती, विविध यज्ञ याग व पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती सोहळा मोठ्या धूमधामने संपन्न होणार आहे. याच सोहळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता महानैवेद्य आरती, महाप्रसाद वाटप व इतर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
या सेवा केंद्रात वर्षभर विविध अध्यात्मिक सेवा व अनुष्ठानांचे आयोजन केले जाते. दर गुरुवार व शनिवार सायंकाळी 6.30 वाजता महाआरती पारंपारिक पद्धतीने संपन्न होते, ज्यामध्ये शेकडो भाविक नियमितपणे सहभागी होतात. याशिवाय गौसेवा, बालसंस्कार, मराठी संस्कृती, भारतीय अस्मिता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध सामाजिक कार्यात या मंदिराच्या भाविकांची टीम अग्रेसर आहे.
अशा विविध धार्मिक व सामाजिक कार्यांमुळे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भाविकांमध्ये एक अध्यात्मिक वातावरण निर्माण करीत आहे.