बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाध व यांचा नागरी सत्कार सोहळा बुलडाणेकरांनी आयोजित केला आहे. रविवार ३० जूनला या सत्कार सोहळ्याचे नियोजन असून, त्याच नियोजनाच्या पूर्वतयारीची बैठक आज पार पडली.
सलग चौथ्यांदा खासदार म्हणून विजयश्री प्राप्त केल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी केंद्रीयमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. शिवाय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची देखील जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा देशपातळीवर हा सन्मान होत असल्याने समस्त बुलडाणेकरांना याचा अभिमान आहे. त्यामुळे ना.प्रतापराव जाधव यांचा नागरी सन्मान व्हावा या उद्देशाने आज, २२ जूनला बुलडाणा शहरातील विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. नागरी सन्मान सोहळ्याच्या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पत्रकार राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्याला खासदार म्हणून लाभलेल्या मुकुल वासनिक व आनंदराव अडसूळ या दोघांनाही आपल्या कार्यकाळात केंद्रात मंत्रिपदे प्राप्त झाली होती, परंतु हे दोघेही बुलढाणा जिल्ह्याचे मूळ राहिवासी नव्हते, त्यामुळेच खा. प्रतापराव जाधव यांच्या मंत्रिपदाने जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना आनंद झाल्याचे दिसून आले. आपला लोकप्रतिनिधी केंद्रात मंत्रिपदावर आरूढ झाल्यांनंतर आपल्या लोकांकडून त्यांचा यथोचित सत्कार व्हावा, ही भावना जिल्ह्यातील सर्व नागरिकांची आहे व याचं जनभावनेचा आदर करण्यासाठी व भूमिपुत्र ना. प्रतापराव जाधव यांचा स्वगृही सत्कार सोहळा आयोजित करण्यासाठी जिल्ह्यातील काही नामवंतांनी आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात “विसावा” विश्रामगृहावर सभा आयोजित केली होती. सदर सभेला कुठलीही पक्षीय वा राजकीय भावना न ठेवता अनेक नामवंतांनी हजेरी लावली व आपल्या माणसाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यासाठी विविध कल्पनाचा विचार करण्यात आला. शेवटी पत्रकार राजेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ गजानन पडघान, ओमसिंग राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे, कुणाल गायकवाड, सौ. स्मिता चेकटकर, प्रा. अमोल वानखेडे, प्रा. अनिल रिंढे, सुनील जवंजाळ, युवराज वाघ, सुनील सपकाळ, निलेश भुतडा, अरविंद होंडे, मंदार बाहेकर, डॉ. दुर्गासिंग जाधव, सुनील देशमुख अशी सर्वसमावेशक व जात-पात-पक्ष निरपेक्ष अशी एक सत्कार सोहळा समिती नेमण्यात आली, या समिती सदस्यांची अजून वाढ करण्याचेही ठरले. ना. प्रतापराव जाधव यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्याची सर्व जबाबदारी सर्वसहमतीने देण्यात आली.
नियुक्त समितीने पहिला निर्णय म्हणून या सत्कार सोहळ्याला ऐतिहासिक बनवण्याचा निर्धार करून या सत्कार सोहळ्याचे “प्रतापपर्व.. सत्कार भूमिपुत्राचा!” असे नामकरण करून या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वयंप्रेरणेने उपस्थित राहून आपल्या माणसाच्या कौतुकाला हजेरी लावावी, असे आवाहन केले आहे.