बुलढाणा (हॅलो बुलडाणा/प्रशांत खंडारे) असंख्य दिव्यांग बांधव जिद्द व कष्टाच्या जोरावर नियतीला हरवतात तर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने वशिलेबाज कर्मचारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लाभ लाटत असल्याने आजचा ‘जागतिक दिव्यांग दिन’ खऱ्या अर्थाने ‘दीन’ वाटतोय! जिल्ह्यासह राज्यात आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ केल्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी यंत्रणांमध्ये अशी बोगस प्रमाणपत्र सादर केलेले कर्मचारी रडारवर आलेत खरे मात्र संबंधित यंत्रणा चौकशीस टाळाटाळ करीत असून सरकारही याबाबत गंभीर दिसत नसल्याचे अस्वस्थ चित्र आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पूजा खेडकर यांच्या सारखे बोगस प्रमाणपत्र लाटणारे (त्यांना आपण त्यांचे लाडके भाऊच म्हणूया ) अनेक प्रशिक्षणार्थी,स्थानिक संस्था व सरकारी यंत्रणेत शिरले आहेत. या बोगसगिरी करणाऱ्यांचा राज्यात तर मोठा आकडा आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणाऱ्या काही वशिलेबाज मास्तरांनी पैसे देऊन बनावट व खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून सोयीच्या ठिकाणी जास्त ताण नसलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली करून घेतल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर इतरही कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा सहारा घेऊन त्यांनी सरकारची फसवणूक केली आहे.यांना खोटे दिव्यांग प्रमाणपत्र कोणी मिळवून दिले आहेत आणि त्यासाठी किती पैसे मोजले होते? त्याचप्रमाणे असे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारी टोळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असल्याच्या संशयाला बळ मिळत आहे.या टोळीत नक्कीच सरकारी बाबू देखील सामिल आहेत हे आता उघड होत आहे. खऱ्या दिव्यांगांना लाभापासून वंचित ठेवून त्यांच्यावर एक प्रकारे हा अन्याय केला जातोय. दरम्यान पोलीस प्रशासनाने या टोळीचा शोध घेऊन पर्दाफाश करावा, सरकारने त्वरित या सर्व बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्यांची कठोर तपासणी करावी,व शासनाची फसवणूक करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पुढे आली आहे. ही मागणी पूर्णत्वास गेली व खऱ्या दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळाला तरच खऱ्या अर्थाने जागतिक दिव्यांग दिन साजरा होऊ शकणार आहे.