बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आपला उमेदवार निवडून येणार हा प्रगाढ आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात तर शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष गजेंद्र दांदळे यांनी मतदानाच्या रात्री फटाके फोडून आमदार संजय गायकवाड निवडून येणार असल्याचा जल्लोष साजरा केला.दरम्यान महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके ह्याच जिंकणार असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी केला आहे.विशेष म्हणजे दत्ता काकस यांनी विद्यमान आमदार संजय गायकवाड लीड घेऊन निवडून आले तर राजकीय संन्यास घेणार आणि गजेंद्र दांदळे यांनी सुद्धा बुलढाण्यात गायकवाड यांना लीड न मिळाल्यास राजकारणात पाऊल ठेवू नये असे ओपन चॅलेंज केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा विजय निश्चित असल्याचा आनंद शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष गजेंद्र दांदळे यांनी काल येथील संभाजीनगर येथे फटाके फोडून साजरा केला. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस म्हणाले की महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांची मशाल पेटणार आहे. त्यांच्या नावातच जयश्री असून ‘जय ‘श्री’ राम ! असा नारा त्यांनी लगावला. त्यांनी विरोधक समजले जाणारे शिंदे गटाचे शहराध्यक्ष गजेंद्र दांदळे यांना खुले आवाहन केले आहे की बुलढाणा शहरात आमदार गायकवाड यांना लीड मिळाला तर मी राजकीय संन्यास घेईल आणि जर जयश्रीताई शेळके यांना लीड मिळाला तर दांदळे यांनी राजकीय संन्यास घ्यावा.या दोन्ही पदाधिकारी यांना नगरपालिका निवडणुकीत अधिक रस असतो.परंतु विजयाचे फटाके कोण फोडणार? हे उद्या मतमोजणीनंतर निश्चित समजणार आहे.