बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन करीत रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन ‘मतदान करा’ असा संदेश दिला. संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील दर्जेदार शैक्षणिक केंद्र म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिरची ओळख आहे. विविध उपक्रम घेण्यासाठी संस्थेचा कायम पुढाकार असतो. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून ‘मतदान करा’ असा संदेश दिला. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवात नागरिकांनी भरभरुन सहभाग घ्यायला हवा. तेंव्हाच सुदृढ लोकशाही निर्माण होऊ शकते. मतदान हा प्रत्येकाचा पवित्र अधिकार असून सर्वांनी तो बजावला पाहिजे.
मतदानाचा टक्का सुधारण्यासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते. नागरिकांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन करण्यात येते. तरी सुद्धा पाहिजे त्याप्रमात मतदान होत नाही. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी असतानाही अनेकजण मतदान करीत नाही. बाहेर फिरायला जाणे किंवा इतरत्र गुंतून राहण्यात धन्यता मानतात. ही बाब चुकीची असून या मानसिकतेमध्ये बदल होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये मानवी साखळीतुन मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.