बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाण्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी येत्या अधिवेशनात मंजुरात मिळवून देतो, अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या संदर्भात चर्चा करून सांगितले.आ. संजय गायकवाड व आ. संजय रायमूलकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याच्या केलेल्या मागणीसंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, असेही ना. जाधव यांनी ना. पवार यांना सांगितले. आयुर्वेद ही सुमारे तीन हजार वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. भारतात अतिप्राचिन काळापासून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात. विश्वाला आयुर्वेदीक उपचार पद्धतीची देण भारताने दिली आहे. आयुर्वेदाने अनेक व्याधी दूर होतात. त्यामुळे या उपचार पद्धतीकडे नागरिकांचा कल असतो. परंतु सर्वसामान्यांना विनामूल्य उपचार पद्धती उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे शासकीय रुग्णालय जिल्ह्यात कार्यान्वित नाही. जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेण्यासाठी इतरत्र जावे लागते. बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच जिल्ह्यात अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक वनस्पतीही अस्तित्वात आहेत. त्याचा उपयोगही आयुर्वेदासाठी होऊ शकतो. जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मेहकर या तालुक्यात आदिवासीबहुल समाजाचे वास्तव आहे. येथील आदिवासीबांधव हे आयुर्वेदिक चिकित्सेवर विश्वास ठेवणारे असून जिल्ह्यातील नागरिकांनाही अतिप्राचिन आयुर्वेदिक उपचार सुविधा मिळणाच्या दृष्टिकोनातून शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याची मागणी आ. संजय रायमूलकर व आ. संजय गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. दरम्यान, केंद्रिय आयूष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यात १९ जून रोजी भेट झाली. यावेळी आमदारद्वयांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर ना. प्रतापराव जाधव यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरात देऊन त्यांसदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडे पाठवा, मी येणाऱ्या अधिवेशनामध्येच त्याला मंजुरात मिळवून देतो, अशी ग्वाही ना. जाधव यांनी दिली.