बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असून, त्यांच्याच चिखली विधानसभा मतदारसंघात हिंदुत्ववाद्यांचा त्यांना प्रखर विरोध होताना दिसत आहे.संघ परिवारातील हिंदू राष्ट्रसेनाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी गुंडगिरीचा वापर होत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. त्यांनी श्वेता ताई महाले यांचे नाव न घेता असेही म्हटले की, माझ्या सभेत कार्यकर्त्यांना दडपशाही करून रोखण्यात आले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघ नवनव्या घडामोडींनी तापत आहे.अशात भाजपाच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्या संदर्भात अनेक नाराजीचे सूर उमटत असून आता संघ परिवारातील हिंदुराष्ट्र सेनाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी देखील प्रचंड असंतोषाचा सूर आळवला. पवार यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. याचा जबर फटका महाले यांना निवडणुकीत बसू शकतो.दरम्यान विजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना सभेत येण्यापासून दडपशाहीने रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.ते म्हणाले की माझ्या सभेमध्ये न येण्यासाठी गावातल्या गावात कार्यकर्ते व नागरिकांना थांबविण्यात आले.त्यांच्या घरी रात्री बेरात्री चकरा मारण्यात आल्या.त्यांच्या आई-वडिलांना बोलावून धाकधपट करण्यात आली तसेच वाहन चालकांना दुपटीने पैसे देऊन वाहने रद्द करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर मला चेलेचपाट्यांचे फोन येत असून
भेटण्यासाठी बोलावत आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी पैशांचे आमिष देखील दाखविण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. तरीही मी उमेदवारी मागे घेणार नाही कारण श्वेता महाले यांनी हिंदुत्ववादी विचारधारेला तिलांजली दिली आहे.त्यांनी हिंदुत्ववादी निष्ठावंतांना आतापर्यंत दूर ठेवले आहे,असेही विजय पवार म्हणाले.