बुलडाणा (हॅलो बुलढाणा) शासनाच्या परिपत्रकानुसार , जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रात येत असलेले शांतता झोन त्वरीत जाहीर करावेत तसेच शहरात शांतता झोनचे फलक लावून आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी १८ ऑक्टोबर रोजी निर्गमीत केले आहेत.
बुलढाणा जिल्हयामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शांतता झोन त्वरीत जाहीर करण्यात यावे, अशी मागणी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत अपर जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांनी बुलढाणा जिल्हयामध्ये शासनाच्या दिनांक २१/०४/२००९ रोजीच्या परिपत्रकानुसार शांतता झोन त्वरीत जाहीर होण्याकरीता सदर बाबत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना कळविले होते. त्यावरून त्यांनी जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, खामगांव, शेगांव, नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगांव जामोद व संग्रामपूर या नगर पालिका, नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.एका पत्राद्वारे काढण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ध्वनीप्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० व वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पोलीस आयुक्त असलेल्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व इतर शहरात / क्षेत्रात संबंधित जिल्हा अधिक्षक यांची व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ध्वनी प्राधिकरण म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली असल्याने तसेच पर्यावरण विभागाच्या दिनांक २१/०४/२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थानी शहरी भागात शांतता झोन जाहीर करून योग्य ते आदेश काढण्याबाबत तसेच शहरात शांतता झोनचे फलक लावून आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच संदर्भिय शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करुन याबाबत अर्जदारास परस्पर अवगत करण्याबाबत कळविण्यात आले आहे.