बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे.पंतप्रधान पिक विमा योजनेतील 497.93 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगाम सन 2023-24 अंतर्गत अनुक्रमे रु. 252.51 कोटी व रु.245.42 कोटी असे एकुण रु. 497.93 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर झालेली आहे. मंजुर नुकसान भरपाईपैकी विमा कपंनीने खरीप हंगामातील रु.138.51 कोटी व रब्बी हंगामातील रु.125.23 असे एकुण रु.264.07 कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत केली आहे. विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदी प्रमाणे पीक विमा कंपनीने एकुण प्रिमियम रकमेच्या 110 टक्के नुकसान भरपाई वितरीत केली असून उर्वरीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत करण्याकरिता रक्कम रु.233.83 कोटी निधीची आवश्यकता असून भारतीय कृषि विमा कंपनीने शासनाकडे निधी मागणी केली असल्याचे कळविले आहे. सदरील निधी प्राप्त होताच प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम संबंधित लाभार्थ्यांचे बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात येईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024-25 अंतर्गत पीक नुकसानीबाबत तक्रार दाखल केलेल्या विमाधारक शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे सुरु असून पंचनामेकरिता पैसे देण्याची आवश्यकता नाही. परंतू पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता गैरमार्गाने पैशाची मागणी केल्यास तात्काळ कृषि विभागास लेखी तक्रार दाखल करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच दि.20 ते 22 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी/अवेळी पावसामुळे विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झालेले असल्यास नुकसानीबाबतची तक्रार ही रितसर मार्गानेच दाखल करावी जसे की, Crop Inssurance App किंवा टोल फ्री क्रमांक 14447 ,टोल फ्री क्रमांकावर संपर्क न झाल्यास पीक नुकसानीची माहिती भारतीय कृषि विमा कंपनीचे तालुका कार्यलय येथे द्यावी व पोच ठेवावी, या व्यतिरीक्त इतर माध्यमाद्वारे तक्रार दाखल करण्यात येऊ नये जिल्हा कृषी विभागाने केले आहे.