चिखली (हॅलो बुलडाणा) राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली आणि चिखली शहरामध्ये, चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये एक मोठा स्कॅम घडण्याचा वा घडवण्याचा डाव माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी लक्षात आणून दिला.
चिखली शहरामध्ये व विधानसभा मतदारसंघामध्ये मागील 25- 30 वर्षापासून राहणाऱ्या व मागील अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या शेकडो युवक व प्रौढ यांना,त्यांनी आपले नाव मतदार यादीतून काढून टाकण्यासंबंधी अर्ज सादर केले आहेत असे मेसेज प्राप्त झाले.मोबाईल मध्ये येणाऱ्या मेसेज कडे दुर्लक्ष करण्याचा शक्यतो सगळ्यांचा कल असतो,तर काहीजण त्याला स्पॅम म्हणून सोडून देतात.परंतु असे मॅसेज बऱ्याच जणांना आल्यानंतर काही लोकांनी ही बाब माजी आमदार राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या कानावर घातली. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन यासंबंधी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता खरोखरच त्यांच्या नावाने कुणीतरी अज्ञाताने आपले नाव निवडणूक यादीतून वगळण्यासंबंधी विनंती करत असल्याचा फॉर्म न. 7 व फॉर्म न. 8 निवडणूक आयोगाकडे ऑनलाइन भरला असल्याचे लक्षात आले.
यानंतर या प्रकरणात राहुल बोंद्रे यांची एन्ट्री झाली. सत्ता नसली तरी सत्ताधाऱ्यापेक्षा कमी नसलेले राहुल बोंद्रे यांनी या प्रकाराची त्वरित माहिती मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तक्रार अर्ज देऊन कळवली,पण फक्त शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहतील ते राहुल बोंद्रे कसले?त्यांनी त्यांच्या यंत्रणेतर्फे या प्रकरणाच्या मुळाशी खोल जाण्याचा निर्णय घेतला,आणि या स्कॅमची बरीचशी मुळे ही ठाणे व पुण्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी प्रसारित केलेल्या माहितीनुसार,ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली व पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून चिखलीतील मतदाराचे “डोंबिवली व हडपसर येथे मतदान यादीत नाव यावे म्हणून निवडणूक आयोगाचा फॉर्म आठ भरल्याचे लक्षात आले”. एकदा हा फॉर्म आठ भरला गेला की “फॉर्म सात” हा “ऑटो जनरेटेड” आहे.म्हणजे डोंबिवली व हडपसर येथील मतदार यादीत चिखलीतील मतदाराचे नाव दिसेल,पण चिखली विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून त्या मतदाराचे नाव आपोआप गायब होईल.
आता हा फॉर्म भरण्यासाठी जो मोबाईल नंबर वापरला जातो,अशा एका नंबर वरून जास्तीत जास्त दहा फॉर्म भरले जातात.आणि ठाणे व डोंबिवली आणि हडपसर, पुणे या ठिकाणी असे हजारो फॉर्म आठ भरले गेले असतील तर त्यासाठी किमान शंभर ते दोनशे खोटे मोबाईल न. घेऊन हे सगळे “कांड” करावे लागले असेल. एवढ्या मोठ्या शहरात हजार ,दीड हजार फॉर्म सहज ऍडजस्ट होऊन जातात, म्हणून ही मोठी शहरी निवडली गेली असावीत असा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची इथंभूत माहिती माजी आमदार राहुलभाऊ बोन्द्रे यांनी एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे.
जर माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले राहुल बोंद्रे यांच्या आरोपात तथ्य असेल तर हर्षद मेहता किंवा इतर कोणत्याही आर्थिक घोटाळ्यापेक्षा हा मोठा घोटाळा आहे.कारण कोणत्याही आर्थिक घोटाळ्यामध्ये फक्त लोकांच्या पैशाचेच नुकसान होते,परंतु या प्रकारच्या घोटाळ्यामध्ये त्या मनुष्याचे अस्तित्व समाप्त होते.स्वातंत्र्य हे जगण्याचे सर्वोच्च मूल्य आहे पण मतदानाच्या स्वातंत्र्यावरच जर घाला घातला जात असेल,तर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मूलभूत अधिकाराची ती हत्या असून,हा मनुष्य वधापेक्षाही मोठा गुन्हा आहे.असे प्रतिपादन माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे