बुलढाणा (हॅलो बुलडाणा) 17 स्थानिक भारत विद्यालय बुलढाणा येथे कार्यरत व इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक अरविंद पवार ह्यांना राज्यस्तरीय बेस्ट इंग्लिश टीचर अवार्डने सन्मानित करण्यात आले. सारथी इंग्लिश स्पीकिंग क्लब क्लब सोलापूर तर्फे माध्यमिक गटात त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण श्री सिद्धेश्वर महिला इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूरचे प्राचार्य डॉ. तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार दिनांक 16 जून रोजी टी.डी. एफ हॉल सोलापूर या ठिकाणी वितरित करण्यात आला . इंग्रजी ही जागतिक स्तरावरील ज्ञानभाषा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. शिक्षक अरविंद पवार यांनी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केले असून विविध विषयावरील तज्ञ व्याख्याने त्यांनी दिली आहे. तसेच फुल ब्राईट फेलोशिप घेऊन त्यांनी क्लेअरमोंट कॅलिफोर्निया येथे अमेरिकन शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला आहे. आपल्या या ज्ञानाचा उपयोग बुलढाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी ते करत असतात हे विशेष. त्यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.