लोणार (हॅलो बुलढाणा/ संदीप पाटील) नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा येवती येथील विद्यार्थ्यांकडून क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील कमळजा माता मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.
देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या या चिमुकल्यांनी दर्शनासोबतच छोटेसे समाजकार्य सुद्धा केले.शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक भंडारे सर हे शाळेत नेहमीच विविध समाजातील उपक्रम राबवत असतात. या छोट्याशा सहलीदरम्यानही त्यांनी लोणार सरोवरातील विविध मंदिरे, पाण्याचे खळखळ वाहणारे झरे, पक्षांचे मंजुळ आवाज, नैसर्गिक वातावरण याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. पर्यावरण जतन करण्यासाठी प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे याची शिकवण देत कमळजा माता मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या या उपक्रमाचे लोणार पंचक्रोशीतून कमळजादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी, व मी लोणारकर टीम यांनी अभिनंदन व कौतुक केले.