मलकापूर (हॅलो बुलढाणा / करण झनके) शेतकरी,शेतमजूर व सूतगिरणी कामगार यांच्या प्रश्नावर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मलकापूर येथील वीर जगदेवराव सूतगिरणी ही मागील अनेक वर्षांपासून बंद असून तिला पूर्ववत सुरू करण्याचे कुठलेही प्रयत्न मलकापूरतील शेतकरी नेते किंवा प्रशासनाकडून होतांना दिसत नाही.एकीकडे हवामान बदलाच्या अनिश्चिततेमुळे उत्पन्नाची विशेष खात्री नसलेल्या बळीराजाला हाती असलेले उत्पन्न विकण्याचे हक्काचे स्थानही मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासन तसेच राजकीय पुढारी पूर्णपणे उदासीन दिसत आहेत.
सूतगिरणी सुरू असतानाच्या काळात यात घोटाळा करून ज्या राजकीय नेत्यांनी स्वतःची घरे भरली आता त्यांची संपत्ती जप्त करून मजुरांची देणे परत करण्याची प्रमुख मागणी करताना कापूस व सोयाबीनला हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा इत्यादी मागण्यासाठी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे आमरण उपोषणाला बसले आहेत.त्यांचे सोबत दादाराव जुनारे, विवेक पाटील, ललित डवले, सुजित पाटील इत्यादींनी पाठिंबा दर्शविला आहे.