बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजे लॉनमध्ये प्रत्येकाला गरबा फीवर चढलेला .. हटके वेशभूषा.. पारंपारिक पोशाख.. ठेका धरायला लावणारी संगीतमय गाणी आणि त्यावर महिला व युवतींचा थिरकण्याचा अनोखा नृत्याविष्कार असा माहोल नवरात्रीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी बुलढाणेकरांना मोहिनी घालणारा ठरला ! ऊर्जा आणि प्रेमाचा उत्सव असलेल्या गरबा फेस्टिवलचे यंदा ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स टॅटू टेम्पल यांच्या संयुक्त विद्यमाने शानदार आयोजन करण्यात आले आहे. या गरबा महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय!
‘हॅलो बुलढाणा’ न्यूज वेब पोर्टल व कायस्थ कॅटर्स टॅटू टेम्पल यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णूवाडीतील राजे गार्डन येथे 20 सप्टेंबर ते एक आक्टोंबर दरम्यान मोफत विशेष गरबा प्रशिक्षण घेण्यात आले. आता हा गरबा उत्सव तीन ते 11 ऑक्टोबर दरम्यान रंगत जाणार आहे.शिवाय गरबा खेळणाऱ्या महिला व युवतींसाठी लाखोंचे जिंकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. पहिल्याच दिवसातील गरबा उत्सावाने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचवला आहे. एकापेक्षा एक वेशभूषा व नृत्याने उपस्थितांना भुरळ पाडली होती. यावेळी उत्कृष्ट गरबा सादरीकरण करणाऱ्या महिला व युवतींना माजी आमदार विजयराज शिंदे, अर्पिताताई शिंदे ‘हॅलो बुलढाणा’चे संपादक जितेंद्र कायस्थ, राजेंद्र कायस्थ, रंजना राजेंद्र कायस्थ, उपसंपादक अजय राजगुरे यामान्यवरांनी बक्षिस देऊन सन्मानित केले.अजूनही गरब्यावर थिरकण्याचे, डोलण्याचे दिवस बाकी असून,या गरबा उत्सवाच्या घटाला पूजून निखळ आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.