बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील सन २०२३ च्या खरीप व रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यासाठी संबंधित कंपनीला बाध्य करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. मुंबई येथे मंत्रालयात रविकांत तुपकरांनी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली घेतली.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिकविमा मिळावा यासाठी रविकांत तुपकर सातत्याने आंदोलने करीत आहेत तसेच शासन दरबारी त्यांचा जोरदार पाठपुरावाही सुरूच असतो. त्यांच्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पिकविमा कंपनीने सन २०२३ च्या खरीप हंगामातील पात्र २ लाख २४ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३८ कोटी ५१ लाख रु. पिकविमा जमा केला आहे. तर रब्बी हंगामातील पात्र ५६ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२५ कोटी २२ लाख रुपये पिकविमा कंपनीने जमा केला आहे, हे रविकांत तुपकर व शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे यश असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील रविकांत तुपकरांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे. रब्बी हंगामात पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाही, त्याचबरोबर खरीप हंगामातील ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. ‘त्या’ शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग व अपात्र अशा १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी लावून धरली आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली आणि पिकविम्यापासून वंचित असलेल्या व कंपनीने अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा जमा करण्याबाबतची मागणी रेटून धरली. सरकारने कंपनीला उर्वरित रक्कम अदा करून तातडीने पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे, त्याचबरोबर पिकविमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पिकविमा कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना कृषी प्रधान सचिव जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.
▪️तुपकरांनी कृषी प्रधान सचिवांसमोर मांडला पिकविम्याचा गोंधळ !
बुलढाणा जिल्ह्यात AIC कंपनीने पात्र शेतकऱ्यांसोबत अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा केला पण पोस्टहार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा दिला नाही,ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर एकच वेळी तक्रार केलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले तर दुसऱ्या शेतकऱ्याला पिकविम्यापासूम वंचित ठेवले, पंचनामे करतांनाही मोठा घोळ घातला असून त्यावर कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांच्या सह्या नाहीत, ऑफलाईन पंचनाम्यामध्ये नुकसान बरोबर दाखविले व पण ऑनलाईन करतांना नुकसान कमी दाखविले. हे पंचनाम्याचे फॉर्म कंपनी कृषी विभागाला द्यायला तयार नाही, या सारखे अनेक गोंधळ या कंपनीने करून ठेवले आहे. हा सर्व प्रकार रविकांत तुपकरांनी कृषी प्रधान सचिवांसमोर मांडला व पिकविमा देण्यास विलंब करणाऱ्या AIC कंपनीवर कारवाईची मागणी केली.