बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्योग शक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत शुक्रवार पासून ३ दिवस भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीला येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरच्या प्रशस्त प्रांगणात प्रारंभ होत आहे. गेल्या वर्षी या प्रदर्शनी मधून 10 कोटींवर उलाढाल झाली होती यावर्षी मात्र हा आकडा अधिक फुगणार आहे. दीड हजारावर अधिकृत नोंदणी झाली असून प्रदर्शनीत 250 पेक्षा जास्त स्टॉल लागणार आहेत. दरम्यान बुलडाणेकरांनी या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रोहिणी ताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस तथा प्रवक्त्या हेमलता पाटील राहतील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे राहातील.या शिवाय अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती दिशा बचत गट फेडरेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ४ ते ६ ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीची जय्यत तयारी सुरु असून अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी ही बचत गटाची भव्य प्रदर्शनी आयोजित होत असते.परंतु यावर्षीची ही प्रदर्शनी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची ठरणार आहे. भीमथळी जत्रेच्या खाजगी पातळीवर ही पहिली भव्य प्रदर्शनी असेल अशा जयश्रीताई शेळके पत्रकार यांना माहिती देताना म्हणाल्या.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन ही महिलांच्या सक्षमीकरणासाठीची चळवळ आहे. आयुष्यात प्रगतीची दिशा मिळते तेव्हा यशस्वी होण्याची वाटचाल कुणीही थांबवू शकत नाही.बचतगटांच्या माध्यमातून जयश्री शेळके यांनी महिलांना स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिशा फेडरेशन मुळे हजारो महिला प्रगतीच्या वाटेवर आहेत.महाराष्ट्रातील भव्य अशा दुसऱ्या क्रमांकाच्या आयोजित करण्यात आलेल्या या भव्य बचत गट प्रदर्शनीला बुलढाणेकरांनी भेट द्यावी असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.