मेहकर (हॅलो बुलढाणा) अमरावती विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु काही विद्यार्थ्यांना अपरिहार्य कारणामुळे परीक्षा देता येत नाही. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे स्वतःचे झालेले अपघात किंवा परिवारातील सदस्याचा मृत्यू अशा अपरिहार्य कारणामुळे परीक्षा देता येत नाही. परीक्षा न दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाते. सबब विद्यार्थ्यांची कुठलीही चुकी नसताना व त्यांच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊन नुकसान होते. दरवर्षी अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे परीक्षा न देता आल्याकारणाने संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते.या संवेदनशील विषयावर तोडगा काढून असे विद्यार्थी जे की परीक्षेला मुकलेले आहेत त्यांच्यासाठी काही कालावधीनंतर परत परीक्षा घेण्यात येऊन त्यांचे वर्ष वाचविण्यासाठी मेहकर वकील संघातर्फे सिनेट सदस्य एडवोकेट संकेत सावजी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन मेहकर वकील संघातर्फे अध्यक्ष एडवोकेट निखिल मिटकरी,सचिव एडवोकेट समाधान कटारे, उपाध्यक्ष एडवोकेट संदीप वाघमारे, एडवोकेट आनंद राऊत, एडवोकेट दिलीप वानखेडे व ॲडव्होकेट नंदा भराड यांनी दिले. सदर बाब सिनेट मीटिंगमध्ये मांडून त्यावर योग्य ते निकष लावून जे विद्यार्थी परीक्षेला मुकलेले आहेत त्यांच्यासाठी परत परीक्षा घेण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे. सदर निवेदन हे येणाऱ्या सिनेट मीटिंगमध्ये मांडून त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन सिनेट सदस्य एडवोकेट संकेत सावजी यांनी दिले. सदर मुद्द्यावर योग्य तोडगा निघाल्यास असंख्य होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होण्यापासून वाचेल अशी आशा मेहकर वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट निखिल मिटकरी यांनी व्यक्त केली.