चिखली (हॅलो बुलढाणा) ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासून शेतात ये-जा करण्यासाठी तसेच मालाची ने-आण करण्यासाठी पांदन रस्त्याचा वापर करीत असत. मात्र, गत काही वर्षापासून पांदन रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याची ओरड आहे.विशेषता चिखली मतदारसंघातील
करवंड ते शेलसूर पांदन रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.हा पांदण रस्ता करण्यासाठी तब्बल 19 लाख 98 हजार 943 रुपये मंजूर झाले होते.परंतु हा रस्ता अर्धवट करण्यात येऊन निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे पावसाळी दिवसात शेतकऱ्यांची दैना उडाल्याने प्रंचड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शेतशिवारात जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यांना ‘पाणंद’ म्हणतात. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्याची गरज आहे. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतरस्ता किंवा पाणंद रस्ता आवश्यक असतो. अनेकदा पावसामुळे हे रस्ते वाहून जातात. त्यामुळे शेतापर्यंत ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रसामग्री नेणे, तयार झालेला शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे कठीण जाते, हे लक्षात घेऊन शासनाने शेत पाणंद रस्त्याची योजना अंमलात आणली आहे.परंतु लोकप्रतिनिधी व यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांच्या कमिशन राजमुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप
करवंड व शेलसूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे.यासंदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. करवंड ते शेलसूर दरम्यानच्या पानांद रस्त्यात चिखलाचे प्रचंड साम्राज्य असल्याने रस्त्याने पायदळ सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून हा रस्ता करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच या रस्त्याच्या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.