बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हुकूमशाही विरोधात बंड पुकारणे काळाची गरज आहे. गुलामगिरीच्या शृंखला तोडल्याशिवाय लोकशाहीचे बीजारोपण होत नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाला संरक्षण देणे क्रमप्राप्त असल्याचे प्रखर मत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील चर्चासत्रात बोलत होते.
जागतिक लोकशाही दिनानिमित्त ‘संविधान वाचन लोकशाही जतन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन संविधान व लोकशाही प्रेमी नागरिकांच्या वतीने 15 सप्टेंबरला बुलढाण्यात करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करतांना रोठेंनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
सर्वप्रथम संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामूहिक माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली.धर्मावाद,जातिवाद बाजूला सारून समतेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी संविधान व लोकशाही जिवंत राहणे महत्वपूर्ण आहे. वर्तमान परिस्थितीत देशात जगात लोकशाहीच्या आडून हुकूमशाही उजागर होत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.आजही सामान्यांना न्यायासाठी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. असे एकंदरीत मत चर्चासत्रातून समोर आले.
चर्चासत्रात आंबेडकरी विचारवंत भाई संदीप खरात, अँड.सतीशचंद्र रोठे, सामाजिक कार्यकर्ते विशाल राणे, सतीश हिवरकर, असलम शाह, अतुल सोनोने, निखिल राणे ,मुकेश तायडे, गणेश पिंगळे, शिवम चिकटे,शाहीर पंचफुला गवई, मिराबाई ठाकरे, सुरेखाताई निकाळजे, अनिता ठाकरे, अनिता कापसे, सौ योगिता रोठे, अन्नपूर्णा झिने, जिजाबाई इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वंयस्फृर्तीने सहभाग नोंदविला.
यशस्वीतेसाठी संविधान लोकशाही प्रेमी मंच, किसान ब्रिगेड,राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, महाराष्ट्र विकास आघाडी,आझाद हिंद महिला संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
संविधान प्रास्ताविकाचे पठण आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.