जळगाव जा.(हॅलो बुलढाणा) गोमाल येथील दुषीत पाणी प्रकरण चांगलेच तापले असून,यादूषित पाण्यामुळे तिघांचे दुदैवी बळी गेल्याने कारणीभूत असलेल्या ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी उपविभागीय अधिकार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे 12 सप्टेंबर रोजी केली आहे.
गोमाल येथे आठ दिवसात दुषीत पाण्यामुळे जीरा,रविन व सागरीबाई या तरुणीचा जीव गेला परंतु अद्यापही जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील साहेबांनी त्या गावाला साधी भेटही दिली नाही.त्यामुळे गटविकास अधिकारी पाटील या प्रकरणात किती संवेदनशील आहेत? यामधून दिसून येते.तीन जीवांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या गोमालचा ग्रामसेवक कैलास चव्हाण आणि गटविकास अधिकारी यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई का केली नाही याबद्दल सुध्दा आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.सहा ते सात दिवस उलटूनही या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही,की केली नाही त्यामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रमुख असून तालुक्यातील अति मागास असलेल्या गोमाल मध्ये येवढी दुर्दैवी घटना घडूनही पाटील साहेबांना जाग येत नसेल तर,तेरी भी चूप,मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका…अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पण ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व घडलं ते ग्रामसेवक चव्हाण व गटविकास अधिकारी संजय पाटील दोघेही अजूनही काही झालेच नाही या आविर्भावात राजरोसपणे मोकाट फिरताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची गंभिरतेने दखल घेणे गरजेचे आहे. तीन कळ्यांना उमलण्याच्या अगोदरच आपल्या प्राणास मुकावे लागले.त्या निरागस जीवांचा करुण अंत झाला. त्यामुळे ग्रामसेवक कैलास चव्हाण आणि गटविकास अधिकारी संजय पाटील यांना कार्यमुक्त करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी बुलढाणा यांचेकडे केली आहे.
▪️ बिडिओनी घातले ग्रामसेवकाला पाठीशी!
ग्रामसेवक चव्हाण यांची सहा महिन्या अगोदर बदली होऊनही गटविकास अधिकारी पाटील यांनी बदली बाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सदरचा प्रकार हा ग्रामसेवक चव्हाण यांना बिडिओ पाठीशी घालण्याचा आहे असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.














