चिखली (हॅलो बुलडाणा) सोयाबीन तूर कापूस याला भाव नाही, तर कीटकनाशके खते शेतीची अवजारे यांचे भाव वाढतच आहेत.अवकाळी पावसाचे’अस्मानी’ संकट आहेच, सोबत ‘सुलतानी’ संकट म्हणून पिक विमा सरकारच्या लालफीतमध्ये अडकला आहे.वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा वाढता डोंगर आहे तर दुसरीकडे पिकाला भाव नसल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत.जगाचा पोशिंदा म्हणवणारा, जगाला जगवणारा, स्वतःच जगणं संपवत आहे.शेतकऱ्यांचा हाच आक्रोश त्यांनी मुख्यमंत्र्याला स्वतःच्या रक्ताची शाई करून पाठवलेला पत्रामध्ये उमटला आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या ही नित्याचीच बाब झाली आहे, त्यात बुलढाणा जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्येने पीडित झाला आहे.शेतकरी आत्महत्या मागची कारणे जाणून, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी, बुलढाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वात चिखली येथील तहसील कार्यालयावर दिनांक 18 सप्टेंबर रोजी “शेतकरी संघर्ष मोर्चा” काढण्याचे नियोजित आहे.या मोर्चामध्ये राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांचा आक्रोश कळावा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमन्त्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून त्यात आपल्या मागण्या नोंदविल्या आहेत.
“सरकारने कल्याणकारी राज्य चालवणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या मागण्यासाठी जर या स्तरावर यावे लागत असेल तर सरकार किती असंवेदनशील झाले आहे,याचा अंदाज येतो” असे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोन्द्रे म्हणाले.