बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रेती उत्खनणातील कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक रेती तस्कर या अवैध रेती व्यवसायात उतरलेत.तालुक्यातील मौजे इसरुळ व धाड येथून अवैध रेती वाहतूक सुसाट सुरू असून रेती तस्करी महसूल व पोलीस यंत्रणेच्या नियंत्रणा बाहेर गेल्याचे चित्र आहे. रेती तस्करांविरुद्ध संतोष भुतेकर यांनी उपोषण पुकारले होते तेव्हा यंत्रणेने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडले परंतु कारवाई करण्याचा शब्द अद्यापही त्यांनी पाळला नाही. त्यामुळे यंत्रणेचे हात रेतीत ओले होत असल्याची साशंकता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतआहे.
खडकपूर्णा व इतर नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे केला जात आहे. त्यासाठी कुठे छुपे पाठबळ तर कुठे महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन आपले काम फत्ते केले जात आहे. महसूल यंत्रणाही कुठे प्रामाणिकपणे तर कुठे केवळ देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी याविषयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी आमरण उपोषण केले होते. दरम्यान पोलीस विभाग आणि महसूल विभागाने मोठमोठे आश्वासन दिले. उपोषण सुटतात परत अवैध रेतीची वाहतूक सैराट झाली. उपोषण वेळी अवैध रेती वाहतुक व उत्खननावर वॉच ठेवण्याचा अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता. धरणामध्ये चालणाऱ्या बोटी नष्ट करू, 24 तास दोन शिफ्ट मध्ये पथके रोडवर ठेवू, कुठल्याही परिस्थितीत रेतीतस्करांना एकही रेतीचा खडा काढू देणार नाही व वाहतूक करू देणार नाही, शिवाय धरणामध्ये चालू असलेल्या बोटी सुद्धा तात्काळ फोडण्याचे प्रयोजन करू, सोबतच धरणामध्ये बोटीवर काम करणाऱ्या पर प्रांतीय लोकांची सुद्धा चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन देऊन मोठ्या विश्वासाने भुतेकर यांचे आंदोलन स्थगित केले होते. केवळ कुठेतरी दोन दिवसच बंद म्हणून यंत्रणेचा आवाज आला नंतर पुन्हा त्याच पद्धतीने अवैध रेतीचा खेळ पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. असंख्य वाहने धरणातून ओल्या रेतीची धाड, इसरूळ चिखली रस्त्यावरून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतूक करीत आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचे लाईव्ह पुरावे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्यानंतर ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी पोहोचवले असता उपविभागीय अधिकारी खडसे साहेब वगळता अनेक अधिकाऱ्यांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा प्रतिशब्द सुद्धा काढला नाही.
उपविभागीय अधिकारी प्राध्यापक खडसे सारखे काही अधिकारी प्रामाणिकपणे रेती घाटांवर नजर ठेऊन आहे. मात्र त्यांची संख्या अगदीच नगन्य आहे. त्यातही त्यांची अधिनस्त यंत्रणा तेवढ्याच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असेल याचीही हमी नाही. संतोष भुतेकर थांबेल असे वाटत नाही तर ते पुन्हा एका नव्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत जर सत्ताधारी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर ही वेळ येत असेल तर सर्व सामान्य जनतेने कसे जगायचे?हा प्रश्न अनुत्तरीत आहे.