बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून प्रकाश डोंगरे 15 वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय असून,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरेंना उद्धव ठाकरेंनी ‘कामाला लागा’ अशी सूचना दिल्याने त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय! परंतू आगामी विधानसभा निवडणूक मतदारसंघात अनेक इच्छुक लढण्यास तयार असून, मेहकर – लोणार मतदारसंघाच्या राजकारणाची कूस कोण बदलविणार? हे येणारी वेळच सांगणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघापैकी मेहकर मतदारसंघ अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. नानाविध समस्यांच्या कक्षा रुंदावताहेत. दरम्यान गत 15 वर्षापासून जनतेसाठी संघर्षरत असलेले उबाठाचे प्रकाश डोंगरे हे मेहकर व लोणार विधानसभा निवडणुकीत संधी शोधताना दिसताहेत. राजकारणातून विकास साधण्याचा त्यांचा मनोदय असून ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.सामाजिक ,राजकीय,कृषी, उद्योग, क्रीडा, साहित्य,
सांस्कृतिक क्षेत्राची खडान् खडा माहिती असल्याने तत्पूर्वी त्यांनी लोणार व मेहकर मतदार संघात आपले अस्तित्व निर्माण केले आहे.दांडगा जनसंपर्क आणि समाज कार्य करण्याच्या शैलीमुळे डोंगरे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करू शकले.त्यामुळे उमेदवारी मिळाली तर मेहकर विधानसभेचे मैदान प्रकाश डोंगरे गाजविणार असून जिंकण्याचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. मतदारही त्यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहताहेत.परंतु असे असले तरी,निवडणुकीला अजून बराच अवधी बाकी आहे.आचारसंहिता सुद्धा लागलेली नाही.परंतु या मतदारसंघात आमदारकीसाठी अनेक इच्छुक आहेत.प्रकाश डोंगरे यांच्यासह डॉक्टर गोपाल बच्छीरे,उर्मिला ठाकरे,अशोक अडेलकर,डॉ. जाणू मानकर, किसनराव पाटील,साहेबराव पाटोळे,सुमित सरदार,सिद्धार्थ खरात,पुनम राठोड, भैय्यासाहेब पाटील,ऋतुजा चव्हाण हे इच्छूक उमेदवार विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपापल्या परीने तयारी करीत आहेत.दरम्यान
मेहकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मजबूत पकड आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांनी काही विकास कामे केली असली तरी,लोकसभेतील पक्षाच्या निकालाची टक्केवारी समाधाकारक नव्हती. सर्वत्र उबाठा शिवसेनेचा निकाल हा विरोधकांचे डोळे विस्फारणारा होता. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडे अनेक इच्छुकांची रीघ लागत आहे.मतदार देखील सत्ताधाऱ्यांना वैतागले असून नव्या आश्वासक चेहऱ्याच्या शोधात दिसताहेत.