बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून बुलढाणेकरांना सोडविणार कोण?’ ही बातमी उमटताच यंत्रणेने त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतच्या खड्डेमय डांबरी रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे.परंतु येथील वाहनधारक व नागरिकांनी पक्क्या डांबरी रस्त्याची मागणी रेटून धरली असून धडाकेबाज आंदोलनाचा इशारा दिलाय.
‘पावसाळा,खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे.यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही’ असा रोखठोक सवाल ‘हॅलो बुलढाणा’ने उपस्थित केला होता. त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरणयातना भोगत असून, रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान यंत्रणेने नागरिकांचा संताप पाहता रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविले आहे. हा नेहमीप्रमाणेचा मलमपट्टीचा उपाय अनेकांच्या पचनी पडला नाही. जेव्हा ठेकेदार रस्ता बांधकाम करतो. तेव्हा त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते. असा करारच असतो.परंतु कमिशनराजमुळे आजकाल रस्ते टिकत नाहीत. कमिशनमुळे रस्त्याची गुणवत्ता योग्य पद्धतीने तपासल्या जात नाही.परिणामी रस्ते उखडतात. तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेणारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी सदर डांबरी रस्त्याचे गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करावे अशी मागणी होत असून,मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात धडाकेबाज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.