बुलढाणा (हॅलो बुलढाणा)एका शेतकऱ्यावर हल्ला करून बिबट्याने ठार केल्याची घटना गेल्या पंधरवाड्यात गिरडा गावाजवळ घडली होती. यानंतर वन विभागाने तात्काळ दाखल घेत गिरडा गावाजवळ 2 पिंजरे लावून 3 पथके स्थापन करून जनजागृती करत वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली होती. वनविभागाने लावलेल्या या पिंजऱ्यात 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एक मादी बिबट अडकली आहे. या बिबट्याला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात रवाना करण्यात आल्याची माहिती बुलढाणा एसीएफ अश्विनी आपेट यांनी दिली आहे.
बुलढाणा तालुक्यातून अजिंठा पर्वतरांग जाते.या पर्वतरांगेवरच गिरडा हे गाव वसलेले आहे. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने या परिसरात गावकरी व शेतकऱ्यांना नेहमी बिबट, अस्वल, तडससारख्या हिंस्त्र प्राणी आढळून येतात. गेल्या काही काळात मानव-प्राणी संघर्षाच्या घटना समोर आल्या आहेत. 29 ऑगस्ट रोजी गिरडा जवळ शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला व उचलून फरपटत जंगलातील दरीत नेले होते. या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. परिसरातील नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते व वनविभागाच्या प्रति त्यांच्या मनात रोष पाहायला मिळत होता. अशात वन विभागाने गिरडा गावाजवळ 2 पिंजरे लावले होते यापैकी एका पिंजऱ्यात गुरुवारी सकाळी एक मादी बिबट अडकली आहे.या बिबट मादीला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात रवाना केले जाणार. गेल्या 2 महिन्यात बुलढाणा वन विभागाने गिरडा परिसरातून आज पर्यंत एकूण 5 बिबट्यांना पकडले आहे. यापैकी 3 बिबटे अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यात आले तर 2 बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडले.
▪️वन विभागाला गिरडा ग्रामस्थांची भक्कम साथ!
गिरडा गावाजवळच बिबट्याने हल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी वन विभागाने सतर्क होऊन कामाला सुरुवात केली आणि वन विभागाच्या मदतीला समस्त गिरडावासी धावून आले. त्यामुळे आतापर्यंत वन विभागाने गिरडा परिसरातून मागील 2 महिन्यात 5 बिबट्यांना सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलविले आहे. डीएफओ सरोज गवस,एसीएफ अश्विनी आपेट, आरएफओ अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. डी.वानखेडे,वनरक्षक प्रदीप मुंडे तसेच वनकर्मचारी परिसरात काम करीत आहे.
▪️मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न!
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्यानंतर वन विभागाने गिरडा परिसरात जनजागृती सोबत वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली. तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी दोन पिंजरे लावलेले होते. यात मागील दोन महिन्यात पाच बिबटे कैद झाले. मानव प्राणी संघर्ष टाळण्या संदर्भातील हे उपाय योजनात्मक पाऊल आहे,असे बुलढाणा येथील
एसीएफ अश्विनी आपेट म्हणाल्या.