देऊळगांव (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव)या पृथ्वीतलावर जो जन्माला आला त्याला एक दिवस जावंच लागते मृत्यू हा देव देवतांना चुकला नाही त्यात आपण कुठे परंतु ज्या सैनिकाने देशासाठी अहोरात्र जागून देशाचे रक्षण केले त्या सैनिकाचे गावाकडे अंत्य संस्कार हा साध्या पद्धतीने केला जातो तो न करता माजी सैनिकाचा अंत्य संस्कार हा वाहनामध्ये सजावट करून देशभक्तीपर गीत लावून त्यांना अंतिम निरोप दिला गेला पाहिजे.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दगडवाडी ग्रामपंचायत ने अंत्य संस्काराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी रघुवीरवाडी येथील माजी सैनिकांचा आदर सुरुवातीपासूनच ही ग्रामपंचायत करत असून आता त्यात पुन्हा भर म्हणून अंतिम संस्काराचा खर्च माजी सैनिकाचा ग्रामपंचायत उचलणार असल्याचा ठराव ग्रामपंचायतीने नुकताच घेतला आहे. ज्या सैनिकांनी देश संरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सैनिकाचा आदर व्हावा म्हणून या गावात सैनिकाचा सुरुवातीपासूनच आदर केला जातो. यामध्ये या गावातील शहीद रघुनाथ जायभाये हे 2002 मध्ये मणिपूर येथे कार्यरत असताना ते शहीद झाले. त्यांचे नाव या गावाला देण्यात आले असून रघुवीरवाडी असे त्यावेळी ठरले असून तो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याचबरोबर शहिदांचे स्मारक या गावांमध्ये उभे केले असून 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला नियमित या स्मारकाचे पूजन केले जाते. त्याचबरोबर या गावातील माजी सैनिक व शहीद जवानांची पत्नी यांना प्रत्येकाला घरकुल देण्यात आलेले आहे. आणि आता नव्याने ही ग्रामपंचायत माजी सैनिकांचा अंतिम संस्काराचा खर्च उचलणार असल्याचे सरपंच सौ चंद्रकला गजानन घुगे यांनी तसा ठरावच पारित केलेला आहे. त्याचबरोबर माजी सैनिक व शहीद जवानांची पत्नी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतचे 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मेला ध्वजारोहण या माजी सैनिकांच्या हस्ते केले जाते हे विशेष! त्याचबरोबर आधी सैनिक व माजी सैनिकांना ग्रामपंचायत कडून ज्या काय समृद्धी दिले जातील त्या सवलतीसाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ. चंद्रकला घुगे यांनी सांगितले.