मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) राजकारणात पद,प्रतिष्ठेसाठी वाट्टेल ते केल्या जाते.आता तर विधानसभा निवडणूक तोंडावर आहे.त्यामुळे अशा प्रकारात वाढ होऊन हौशे-गौशे-नौशे यांना आमदाकीचे डोहाळे लागलेत. मलकापूर येथे स्वंयघोषित ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’मधून हकालपट्टी झालेल्या एका उमेदवाराच्या गुडघ्याला बाशिंग बांधल्याने व त्यांनी भावी आमदाराचा फलक लावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
सध्या काही महिन्यावरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे.अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली.यामध्ये हौशे-गौशे-नौशे गर्दी करत असून प्रसिद्धी मिळवत आहेत.मलकापूर मध्ये एमआयएम मधून हकालपट्टी झालेल्या जिल्हाध्यक्ष शहजाद खान यांना वंचित बहुजन आघाडीच्या स्वयंघोषित तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा महासचिव यांनी भावी आमदार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.शिवाय त्यांचा फोटो असलेला वाढदिवसाचा मोठा फलक भावी आमदार म्हणून झळकविल्यामुळे बुलढाणा घाटाखालील वंचितच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.दरम्यान मलकापूर येथील बाळासाहेब दामोधर यांना बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आतापर्यंत एकही उमेदवार घोषित केलेला नाही. लवकरच पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र तरीही स्वयंघोषित वंचितचे काही माजी पदाधिकारी
मनमौजी कारभार करीत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात याच माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब दामोधर यांनी केला असून आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार असे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब दामोधर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे.