8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

‘खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते!’ -सुप्रसिद्ध कवी, निवेदक अजीम नवाज राही यांची भावनिक प्रतिक्रिया..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)भाषेच्यापलीकडचा, अभिव्यक्तीच्या पार असलेला ऐवज सगळ्यांना एकवटता येतो असं नाही, हजारातून एखादा निपजतो,तगतो,काळाच्या पानावर आपल्या नावाची ठसठशीत मुद्रा उमटवून जातो,

कविवर्य ग्रेस आर्जवी स्वरात म्हणतात
भाषाच ही निकामी
शब्दासही पुरेना
संवेदनाच द्यावी
अर्थात काय पुन्हा,
ग्रेस यांच्या कवितेतली उपरोक्त घुसळण,घुसमट निर्मितीचा पारा शब्दांच्या चिमटीतून सटकतानाची,सटकल्यावर,विव्हळतानाची, तडफडतानाची,घुसमटतानाची

अशी भाषेवर डाफरण्याची पाळी प्रत्येक सर्जकावर येत नाही,ज्यांच्यावर येते त्यांच्याकडे काळाचा पडदा छेदणारी भेदक नजर असते,ती सतिष दराडे यांच्याकडे होती,
सतिष दराडे यांच्या मनाच्या मखरात गजल रुजली,फोफावली,फ़ैलावली,भाषेपलीकडचं,
अभिव्यक्तीपलीकडचं एकवटण्यात त्यांचा हातखंडा झाला, अस्पर्शीत विषयांना कवेत घेत त्यांची गजल पावसाळी नदीसारखी दुथडी भरून वाहू लागली,मानवी जगण्याच्या सगळ्या संवेदनशील पातळ्यांना त्यांच्या गझलेने वेधक,थक्क करणारा स्पर्श केला,थरारांचा थर कागदावर रचला,सादरीकरणाच्या वेळी कानावाटे मनांचा रस्ता चोखाळला,

गजलेची वीज त्यांनी जगण्याच्या मुठीत घट्ट पकडली, प्रतिमा,प्रतीकांच्या आग्यामोहळाच्या पोळात मुंडकं खुपसलं,निर्मितीच्या जटील,दुर्मिळ शक्यता हुकडतांना त्यांनी सर्जकतेच्या उंचवट्यावरून धगधगत्या जीवनानुभवाच्या निवडुंगांच्या झुडपांवर उडी मारली,
गोपाल मापारीचा एक मतला आठवतो,

जखम आई,दुःख जेंव्हा बाप होते
सोसल्यावर गझल आपोआप होते

सतिष दराडे गजलेत आणि गजल त्यांच्यात इतकी समरसून गेली की जगातल्या सगळ्या भौतिकसुखांची मोजपट्टी निर्मितीच्या या आनंदापुढे त्यांना थिटी वाटू लागली, मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला,ही समाधीअवस्था कलावंताच्या जीवनसाफ़ल्याचे अत्योच्च शिखर,सृजनसाफ़ल्याच्या दुरापास्त आनंदाचे सतिष दराडे धनी झाले,ग्रेस म्हणतात

दुःख भरला आले की चंद्र नदीवर येतो
पाण्याचे अस्तर सोलून बिंबाला तळाशी नेतो
क्षितिज जसे दिसते,तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी झिलून घ्यावी कोणी

सतिष बाबासाहेब दराडे यांचा परिचय कधी झाला नाही, प्रत्येक्षात ऐकता आलं नाही, पण त्यांची सकस गजल मसझ्यापर्यंत पोहोचली, घट्ट ओळखीची झाली, ओळखीचा रस्ता प्रशस्त करण्याचं महत्वाचं काम माझे जिवाभावाचे दोस्त प्रसिद्ध कवी तुळशीराम मापारी यांचे प्रतिभासंपन्न सुपूत्र, आजच्या पिढीतले ताकदीचे मराठी गझलकार गोपाल मापारी यांनी केलं, ओळखीच्या प्रशस्तीकरणाचा विस्तृत तपशिल द्यायचा म्हटल्यास मी एक निवेदक,वक्ता,निवेदकाची,वक्त्यांची वाचनाची भूक आवाढय, अफाट,अचाट असावी, जसं काहींचं लेखन एकटाकी असते तसं माझं वाचन एकनजरी, पाठांतराची,घोकंपट्टीची मला निकड भासत नाही,जी कविता,जी गझल मला भावली,
वाचताक्षणी ती माझ्या मनात झिरपते,मनावर मुद्रीत होते,अर्थात पाठ होते,सतिष दराडे यांच्या गजलांची,शेरांची रसद गोपाल मापारीच्या माध्यामातून माझ्या जवळ आली, निवेदनाच्या, व्याख्यानाच्या वेळी माझी अभिव्यक्ती फुलवायला लागली, सतिष दराडे यांच्या गजलांमधली अनुभवाची व्यामिश्रता, पृथगात्मता, विविधता मला थक्क करू लागली,

व्याख्यानात,निवेदनात आवडलेल्या कवींच्या कवितांची, आवडलेल्या गझलकारांच्या शेरांची मनोगताला पुसती जोडतांना त्या कवींची, त्या गझलकारांची नावे मी घेत असतो,ही माझ्या वक्तृत्वाची,निवेदनाची शैली, ज्याचा माल त्याच्याच नावाने विकायचा, मोबदला म्हणून ज्वारीच्या भरदार कणसासारख्या अभिव्यक्तीच्या पदरात पडणाऱ्या टाळ्या ,
मी माझ्यासाठी आखलेल्या या नियमावलीच्या अंमलबजावणीने मन प्रसन्नावते,संबंधाचे वर्तुळ विस्तारते, नवागतांचा,नवीन लिहिणाऱ्यांचा उत्साह दुणावतो,विचारपीठावरची ती तास दोन तासाची सत्ता सत्कारणी लागते,

मराठी गझलेत अनिल पाटील, अरुण सांगोळे,अनंत राऊत, प्रा ज्ञानेश वाकुडकर,प्रदीप निफाडकर,नितीन देशमुख,रुपेश देशमुख,संजय चौधरी,आबिद शेख, वैभव देशमुख,योगीराज माने,वैभव जोशी,सुधीर मुळीक,ममता सिंधू ताई,वंदना वैराळकर,शिवाजी जवरे,गोपाल मापारी, प्रफुल्ल भुजाडे,विनोद बुरबुरे,रमेश बुरबुरे,गजानन वाघमारे,किरण डोंगरदिवे,एजाज शेख,शरद धनगर, विकास घुगे, रमेश आराख,विशाल मोहिते,निलेश कवडे ते सतिष दराडे मराठी गजलेच्या प्रांतात सकस गझललेखन करणाऱ्यांच्या मांदियाळीतली ही ठळक नावे, अजून बरीचशी,

सतिष दराडे यांच्या गजलेची धाटणी वेगळी होती, बाज वेगळा होता,नेणिव,जाणीव वेगळी होती, धोपटमार्ग, मळलेली वाट नाकारत स्वतःच्या मालकीची नवी वहिवाट निर्माण करणारी होती, त्यांच्या अभिव्यक्तीला सूक्ष्मचिंतनाचे कैक कंगोरे होते, वक्त्याला, निवेदकाला अभिव्यक्तीचा पिसारा मनसोक्त फुलवता यावा म्हणून त्यांचे शेर दिमतीला सरसावायचे,

मागील आठवड्यात बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय सुनिल कडासने साहेब यांच्या निवृत्तीचा समारंभ बुलडाणा अर्बन परिवाराने बुलडाणा अर्बन परिवाराचे अध्वर्यू माननीय भाईजी श्री राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता,सूत्रसंचालन माझ्याकडे होते, भव्यदिव्य,तालेवार समारंभ, अख्ख्या महाराष्ट्रातला कडासने साहेबांचा चाहतावर्ग बुलडाणा अर्बन सांस्कृतिक भवनात एकवटलेला, सेवानिवृत्त होणारे जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय सुनिल कडासने साहेब यांना मी सेवानिवृत्तीच्या कातर,हळव्या उंबरठ्यावर मनोगतासाठी सतिष बाबासाहेब दराडे यांचा किता उद्धृत करत आमंत्रित केलं

कधी विणेतूनी आलो,कधी टाळातूनी आलो
तुकोबाच्या व्यथा घेऊन तळागाळातूनी आलो
विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता
तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातूनी आलो

टाळ्यांचा कानठळ्या बसवणारा गजर झाला, कडासने साहेबांसकट उपस्थित श्रोत्यांचे पापणकाठ ओलावले,मनीमानसी नसतांना पापण्या ओलावण्याची किमया माझी नाही,सतिष दराडे यांच्या ओळीमधल्या शोकांत भावार्थाची, मी निमित्तमात्र असल्याची सविनय कबुली,

सतिष दराडे यांच्या लेखणीचे टोक परिसाच्या जातकुळीतलं, हलक्याफुलक्या विषयाच्या लोखंडाला त्यांच्या लेखणीने स्पर्श करावा अन परिघावरच्या त्या
अनुल्लेखित,अव्यक्त विषयाचं सोनं व्हावं, कविवर्य ग्रेस म्हणतात
मी महाकवी दुःखाचा
प्राचिन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल

काही कवी कवितेवर जगतात, काही कवी कविता जगतात, काही कवी कविता हाताळतात,काही कवी कविता सांभाळतात, जे कविता सांभाळतात कालांतराने कविता त्यांना सांभाळत असते,सतिष दराडे कविता,गजल जगले, निर्मितीच्या पक्व टप्प्यावर जगाचा निरोप त्यांनी घेतला,कविवर्य उ रा गिरी म्हणतात
खुलासे अधुरेच राहतात
आणि निघायची वेळ होते

या गझलकाराला भेटावं,मनसोक्त बोलावं,पोटभर ऐकावं हा माझा बेत नियतीने उधळून लावला,42 वर्ष जाण्याचं वय नसतं सतिषराव, आपण केलेली घाई अक्षम्य,

वो तो बता रहा था कई दिन का सफर
जंजीर खिंच कर जो मुसाफिर उतर गया
बिचछडा कुछ इस अदा से के रुत ही बदल गई
एक शख्स सारे शहेर को विरान कर गया

प्रत्येक येणारा आपले जाणे सोबत घेऊन येत असतो पण सतिष दराडे यांचे जाणे पचणी न पडणारे, ही जखम अशीच भळभळत राहणार, ओलावत राहणार पापण्या गझलेच्या,

हे खरे की जखम काही भरत नाही
पण कुणी ताटातुटीने मरत नाही!

एक विश्वासार्ह कविता सोडली तर
मी तुझी तक्रार कोठे करत नाही..!

▪️अजीम नवाज राही, साहिल हाऊस,जाफ्राबाद मोहल्ला
मु पो साखरखेर्डा ता सिंदखेडराजा जि बुलडाणा
9421396669

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!