spot_img
spot_img

बुधवारी रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत बैठक! -उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत रविकांत तुपकर व त्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई, मंत्रालयात ११ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा, अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती,जंगली जनावरांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी मजबूत कंपाऊंड यासह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी ४ सप्टेंबर पासून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला सर्वच स्तरातून जोरदार पाठिंबा मिळाला. शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते पेटून उठले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करून खुद्द उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या स्वाक्षरीचे लेखी निमंत्रण तुपकरांना दिले होते. त्यानंतर रविकांत तुपकरांनी सरकारच्या निमंत्रणावरून आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले होते. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्याने तुपकरांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तुपकरांच्या प्रकृतीत आता थोडीफार सुधारणा झाली असून मुंबईतील बैठकीसाठी ते रवाना झाले आहेत. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. मंत्रालयात उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून या बैठकीत सहभागी होणार असून संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत काय निर्णय होतात आणि कोणत्या कोणत्या मागण्या मार्गी लागतात हे पाहूनच आता तूपकरांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे आता बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!