बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात भरणाऱ्या रविवारच्या आठवडी बाजाराने व्यापारी आणि ग्राहकांना बेजार केले आहे. नगरपालिकेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे बाजारात दुकानापुढे दुकान लावून अतिक्रमण करणे,वादविवाद होणे,मोबाईल चोरीला जाणे,घाणीचे साम्राज्य आणि वाहने कुठेही उभी करणे आदी बेशिस्तमुळे या गैरसोयीच्या बाजाराला शिस्त लावणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुलढाणा शहरात रविवारी आठवडी बाजार भरतो. सध्या तर सण उत्सवाचा काळ असल्याने आजचा रविवारचा आठवडी बाजार गर्दीने व्यापला आहे.जयस्तंभ चौक पासून इकबाल चौकापर्यंतचा व जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेला हा आठवडी बाजार नागरिकांना बेजार करून सोडत आहे. नगरपालिकेच्या संकुलात भरणाऱ्या बाजारात शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी चिखलात बसावे लागत आहेत तर ग्राहकांना चिखल तुडवावा लागत आहे.आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य असून ठिकठिकाणी डबके साचले. बाजारात गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय झालेत.लक्ष विचलित करून चोरटे मोबाईल ढापत असल्याचे प्रकार घडत आहे.बाजाराला येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना व्यवस्थित पार्किंगची सोय नाही त्यामुळे रस्त्यावर कुठेही वाहने लावली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.पोलीस यंत्रणा उदासीन असून,केवळ ड्युटी म्हणून एकाच जागी मोबाईल चाचपडत उभे राहतात.त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगरपालिका आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बाजाराच्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.