बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दगाबाज सत्ताधाऱ्यांचे केवळ उद्योगपतींवर लक्ष केंद्रित असून,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ‘लाडक्या योजनांचा’ गाजावाजा करणाऱ्या या सरकार विरोधात अभूतपूर्व असंतोष निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात मतदार त्यांना त्यांची जागा निश्चित दाखविणार आहे,असे उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी मशाल यात्रा दरम्यान कॉर्नर बैठकीत घणाघात केला.
शिवसेना उबाठाची मशाल यात्रा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात 5 सप्टेंबर पासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काढण्यात येत आहे.सहा सप्टेंबरला मोताळा तालुक्यात ही मशाल यात्रा पोहोचली.नेहरूनगर,वारुळी, वाघजाळ, टाकळी,परडा, सुलतानपूर, शिरवा,धामणगाव देशमुख, पिंपळगाव नाथ, गिरोली, रामगाव तांडा येथे यात्रेदरम्यान सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणाचा सडकून समाचार बुधवत यांनी घेतला. मशाल यात्रेला गावोगावी प्रतिसाद मिळत असून या मशाल यात्रेचा लखलखाट तब्बल 151 गावांमध्ये दिसून येणार आहे. 23 सप्टेंबरला या मशाल यात्रेचा समारोप बुलढाण्यात ‘आक्रोश मोर्चा’ काढून व संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन देऊन होईल.खासदार अरविंद सावंत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक दिग्गज नेते या आक्रोश मोर्चाला उपस्थित राहतील.दरम्यान निष्ठूर सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी प्रत्येकांनी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.