साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई ) डेंग्यू तापाने आजारी रुग्णांची संख्या सतत वाढत असून दोघांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
साखरखेर्डा येथील एका युवकाचा आणि युवतीचा गेल्या महिन्यात डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्राम पंचायतीने गावात धुर फवरारणीला सुरुवात केली होती.परंतू तापेच्या साथीवर पाहिजे तसे नियंत्रण मिळाले नाही. ग्राम पंचायतीने एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले होते.परंतू पावसाळी दिवस असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी साचलेली गटारे, पाणी वाहून जाणारी नाली यावर सतत डोसांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील महिन्यात अशोक देवकर आणि प्रियंका नरवाडे या युवतीचा डेंग्यू तापेने मृत्यू झाला होता.आजही साखरखेर्डा गावात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले आहेत.जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश ठोसरे यांना आणि आयुष श्रीकांत पऱ्हाड यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तापेची साथ झपाट्याने वाढत असून येथील खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. तर काहींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीने ठोस पावले उचलून डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
तापेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विशेष कक्ष स्थापन करुन तापेचे नमूने तपासणी साठी पाठवावे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर उपचार सुरु करावेत. आज एका रुग्णाला बाहेर उपचार करण्यासाठी ५० हजारांपेक्षा जास्त खर्च येत आहे. जो पर्यंत तापेचे निदान होत नाही तोपर्यंत व्यक्ती कोमात जाऊ शकतो . याची दखल घेऊन शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










