बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) पाऊस केवळ राज्यातच रिपरिपत नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून देखील पाऊस झिरपतोय!बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीमुळे तब्बल 145 गावातील 16425 शेतकऱ्यांचे 11609 हे. क्षेत्रावरील हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. ‘आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे?’ असा सवाल उद्विग्न शेतकऱ्यांच्या मनाला टोचत आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बुलढाण्याची ओळख आहे. गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे. गत 3 ते 4 दिवसात इतका पाऊस पडला आहे की शेतजमिनीला पाणथळ जागेचे स्वरुप आले आहे.राज्यासह जिल्ह्यात अनेक भागांमध्ये सध्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे.जिल्ह्यातील जलप्रकल्प ओसंडून वाहताहेत. काही जलप्रकल्पांचे सर्व वक्रद्वार खुले करण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील कोलद, वहगाव वान, रिंगणवाडी, मोमीनाबाद, आदी गावांचा संपर्क तुटला होता.पावसाच्या जोरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस,तूर,मुंग उडीद, मका अशी सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. केवळ 2 दिवसात अतिवृष्टीने चिखलीतील सर्वाधिक 32 गावे तर त्या पाठोपाठ मोताळा तालुक्यातील 31 व खामगावातील 25 गावे, शेगावातील 20 , नांदुरा तालुक्यातील 18, बुलढाणा तालुक्यातील 6, लोणार तालुक्यातील 5 अशी एकूण गावे 145 बाधीत झाली. एकुण 11561 हे. क्षेत्रावर पाणी फेरल्या गेले. यामध्ये 48 हे शेती खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे.












