चिखली (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे मातंग,बौद्ध व अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याचे दुर्दैवी चित्र खंडाळा मकरध्वज येथे आहे.दरम्यान स्वतंत्र स्मशान भूमीसाठी जागा व बांधकाम करून देण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांच्या नेतृत्वात चिखली तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून खंडाळा मकरध्वज येथील मातंग, बौद्ध आणि अनुसूचित जातीतील मृत व्यक्तींना अंत्यसंस्कारासाठी चिखली येथील स्मशानभूमीपर्यंत जावे लागते. यामुळे या समाजातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील नोंदीनुसार खंडाळा मकरध्वज शिवारातील गट नंबर 615 मधील जागेवर स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटून गेली तरीही या भागातील दलित समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही, हे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे दलित बांधवांवर अन्याय होत असून, त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.या मागणीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास, डीपीआयच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांच्या नेतृत्वात चिखली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनावर कुंदन यंगड, भारत यंगड, गणेश यंगड, विजय यंगड, रामेश्वर यंगड, साहेबराव यंगड, गणेश सगट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.