पंढरपूर – तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंदिरात तळघर आढळले असून त्यामध्ये सहा वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये मातीच्या बांगड्या, दगडाच्या मुर्त्या, पादुका सापडल्या असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली आहे.
विठ्ठल मदिराजवळील हनुमान दरवाजाजवळ, कान्होपात्रा मंदिराशेजारी फरशीचे काम करत असताना हे तळघर सापडले आहे. 6 बाय 6 फुटाचे तळघर आहे. त्यामध्ये प्रवेश केला असता मातीच्या बांगड्यांचे तुकडे, नाणी, मूर्ती, पादुका अशा वस्तू सापडल्या आहेत. हे तळघर आतून बंदीस्त असून त्यापलिकडे काही असेल अशी शक्यता आहे. याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सापडलेल्या मूर्तींमध्ये दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर एक मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. या वस्तू पाहिल्या तर साधाराण पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात लवकरच याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.