बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पर्युषणपर्वाला 31 ऑगस्ट पासून प्रारंभ झाला असून 17 सप्टेंबर पर्यंत पर्युषणपर्व जैन समाज बांधव साजरे करताहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समितीने दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला कत्तलखाने बंदचे आदेश निर्गमित केले आहे.
महाराष्ट्र आणि जैन संस्कृती यांचे अजोड, पुरातन नाते आहे. अहिंसा,अनेकांत वाद,शाकाहार अशा उदात्त मानवी मूल्यांचा प्रभाव जैन संस्कृतीमुळे वाढला, असे जैन बांधव अभिमानाने सांगतात.जैन धर्म अहिंसेवर आधारित आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत अनेक प्रकारचे कीटक आणि न दिसणारे सूक्ष्मजीव सर्वाधिक सक्रिय होतात, असे जैन संस्कारांत मानले जाते. या कालावाधीत मनुष्याच्या चालण्या-फिरण्याने या सूक्ष्मीजीवांना धोका पोहाचू शकतो, असा समज आहे. या जीवांना त्रास होऊ नये आणि जैन साधू-साध्वींकडून हिंसा होऊ नये, यासाठी या चातुर्मास काळात ते एकाच जागी मुक्काम करून धर्मसाधना, धर्म आराधना, संयम साधना आणि सर्वसामान्यांच्या आत्मकल्याणासाठी प्रेरणादायी प्रवचने देतात. दरम्यान कत्तलखाने व मासं विक्री बंद ठेवण्याबाबत शासनाला भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समिती तर्फे निवेदन देण्यात आले होते. कलेक्टर ऑफिस मधून कत्तलखाणे 7सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 17 सप्टेंबर 2024, असे 3 दिवस बुलढाणा जिल्ह्याकरिता बंद ठेवण्याबाबतचे आदेश प्रत्येक तालुक्याला निर्गमित करण्यात आले आहे.