बुलडाणा (हॅलो बुलढाणा) शहरात उभारण्यात आलेले महामानवांचे पुतळे मागील काही दिवसांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत आहेत. येत्या काही दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या हातून या सर्व पुतळ्यांचे अनावरण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्यांच्या अनावरणाआधी सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे , अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र ही संतांची आणि महामानवांची भूमी आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा या सर्व संतांच्या महामानवांच्या कर्तुत्वाचा इतिहास आहे. हे सर्व महामानव सबंध महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत, अस्मिता आहेत. बुलडाणा नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या परवानगीने बुलडाणा शहरात विविध ठिकाणी महामानवांचे पुतळे उभारण्यात आले आहे. या पुतळ्यांबद्दल प्रत्येक बुलडाणेकरांच्या मनामध्ये प्रचंड अभिमान आणि आदर आहे. मागील काही दिवसांपासून हे पुतळे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसांत आपण स्वत: बुलडाणा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. आपल्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी ठरवून दिलेले मापदंड पुर्ण न करताच घाईघाईने बसविण्यात आला होता. त्यामुळे शिवरायांचा हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे सबंध शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यभर जनतेच्यावतीने संताप व्यक्त होत असून याचे पडसाद सर्वत्र दिसून येत आहेत.
बुलडाणा शहरात देखील अनेक महामानवांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. हे पुतळे उभारतांना आवश्यक ती सर्व काळजी घेणे अपेक्षित आहे. भविष्यात मालवणच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती बुलडाणा शहरात होऊ नये, यासाठी हे पुतळे बसवितांनाही मापदंड पाळले गेले आहेत का? हे पाहणे महत्वाचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण स्वत: बुलडाणा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करणार असल्याने त्याआधी सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक आहे. हे स्ट्रक्चरल ऑडिट करुन प्रशासनाने ते प्रसिध्दीस द्यावे. ज्यामुळे पुतळ्यांच्या तसेच केलेल्या कामाच्या गुणवत्तेची पडताळणी होईल.
आमचे सर्व संत महामानव हे आमच्या अस्मिता आहेत. या महामानवांनी समाजासाठी आपले संबंध आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या महामानवांच्या प्रतिमांचा आणि पुतळ्यांचा अवमान व विटंबना कदापिही सहन केली जाणार नाही. भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण स्वत: महामानवांच्या सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याशिवाय बुलडाणा शहरातील कोणत्याही पुतळ्याचे घाईघाईत अनावरण करु नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.