देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. या विकृत मनोवृत्तीला आळा बसणे गरजेचे असून स्त्री-रक्षणाची जबाबदारी प्रत्येकांची असल्याची मार्गदर्शक सूचना एसडीपीओ मनीषा कदम यांनी केली.
श्री व्यंकटेश महाविद्यालया मधील अंतर्गत तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा धोरण आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम तसेच ॲड. वर्षा कंकाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.एसडीपीओ
मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, ही चिंतेची बाब असून या विकृत मनोवृत्तीला आळा बसणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. समाजात वावरणारी महिला ही आपल्यासाठी संधी नसून आपली जबाबदारी आहे, याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली तर अशा घटना घडणार नाहीत, असे आवाहनही त्यांनी केले. ॲड. वर्षा कंकाळ यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना आज जिजाऊ सावित्रीच्या लेकी संकटात आहेत, याबद्दल खंत व्यक्त केली. बालविवाह प्रतिबंध कायदा, पोक्सो कायदा अशा प्रकारचे अनेक कायदे महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत. त्याबद्दलची जाणीव जागृती होणे गरजेचे आहे व या कायद्यांचा तसेच अधिकारांचा वापर महिलांनी केला पाहिजे, असे आवाहनही कंकाळ यांनी केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी दशेत इतर प्रलोभनांकडे आकर्षित न होता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशस्वी करिअर घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच सोशल मीडियाचा मर्यादित व विचारपूर्वक वापर करण्याचे आणि समाजातील अपप्रवृत्तींपासून सावध राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. सुनंदा कुहिरे हिने केले. प्रास्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्य डॉ. ज्योती ढोकले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार कु. निशा मोरे हिने व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.