बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) रंगांचे नुसते फटकारे मारले तरी त्यातून एक नवी कलाकृती साकारली जाते. मग कधी तो निसर्ग असतो तर कधी एक अद्भूत विश्व, ज्यात माणूस स्वतःला विसरायला लागतो. रंगांची ही दुनिया फक्त त्याची आणि त्याचीच आहे… कारण चित्रकारिता तो शिकलेला नाही. ती त्याला जन्मजात मिळालेली देण आहे. अशाच कुंचल्यांचा देखणा आविष्कार बुलढाण्यातील विजय क्षिरसागरने साकारलाय! त्याच्या रंगकुंचल्यांच्या अविष्काराने काँग्रेसच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके देखील भारावल्या!
बुलढाणा शहरातील चंद्रमणी नगरात राहणारा विजय ईश्वर क्षीरसागर हा २३ वर्षाचा तरुण आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून तो विविध चित्रकृती साकारत आलाय. विजयने चित्रकला, बांबू हस्तकला, वॉल आर्ट आणि मॉडर्न आर्ट प्रकारातील विविध कलाकृती आणि भित्तीशिल्पांचे संकलन केले आहे. त्याची विक्रीही तो करतो. अतिशय आशयघन आणि वेगळ्या अशा त्याच्या कलाकृतींना खूप मागणी आहे. विजयची प्रत्येक कलाकृतीत रंगसंगती अतिशय उत्तम साकारली गेली आहे. एकदा कुंचला हाती घेतला की ती कलाकृती साकारल्यानंतरच विजय कुंचला सोडतो. त्याच्या या कलाकृतींनी जयश्रीताईंना भूरळ घातली. केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही आज कलेच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे वलय निर्माण करणाऱ्या या कलाप्रेमीच्या पाठीवर कौतुकाची थाप देत विजयला ॲड.जयश्रीताईंनीपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.










